प्रकाशा येथील पेट्रोल पंपावरून ८० हजारांच्या रोकडची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:54 AM2017-07-22T00:54:36+5:302017-07-22T00:54:36+5:30
प्रकाशा-तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा-तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ८० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली.
पोलीस सूत्रानुसार, प्रकाशा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा रस्त्यावरील तोरडे पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास तेथील कर्मचारी आनंद गावीत, सुनील वसावे व सूरज ठाकरे हे झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी केबिनमध्ये घुसून ८० हजार रुपयांची रोकड लांबवून पळ काढला. त्या वेळी तेथील कर्मचाºयांना जाग आल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी गौतम बोराळे, वंतू गावीत, नीलेश सांगळे, पांडुरंग गवळी यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या तपासासाठी श्वानपथक मागविण्यात आले. श्वानपथकाने झाडीपर्यंत माग दाखवला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी भेट दिली. तपास गौतम बोराळे करीत आहेत.
दरम्यान, या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. याआधीही पेट्रोल पंप मालकाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत आनंद कुवरजी गावीत यांनी याबाबत शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.