जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या पूर्ण
By admin | Published: July 16, 2017 12:23 AM2017-07-16T00:23:24+5:302017-07-16T00:23:24+5:30
पिकांना जीवदान, ‘दुबार’चे संकट टळले! : आता मका, तूर, बाजरीवर भर; जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकटही टळले आहे, अशी माहिती कृृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. आजअखेर जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या झाल्या असून जुलै महिन्याअखेर पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. पेरणी आटोपणाºया शेतकºयांकडून आता मका, तूर, बाजरी आदी पिकांवर भर दिला जात असल्याचे सूत्र म्हणाले.
जून महिन्यात मृग, आर्द्रा नक्षत्रात पेरणी झालेल पिके पावसाअभावी वाळून चालली होती, पिके ऊन धरत होती. अशा पिकांना या पावसामुळे एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप पुरेसा पाऊस बरसलेला नाही. परंतु पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
मका, तूर, बाजरीचाच पर्याय
खरीप हंगामास प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटल्याने मूग, उडीद तसेच कपाशी लागवडीचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता मका, तूर, बाजरी, एरंडी या पिकांकडे शेतकरी वळले आहेत. मूग, उडीद ही अल्प कालावधीची पिके असून त्यांची पेरणी जून महिन्यातच होते. १५ जुलैनंतर त्याची लागवड केल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण
पावसामुळे कपाशीच्या लागवडीसही गती मिळाली असून आतापर्यंत १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. कृषी विभागाने या पिकासाठी १ लाख ८७ हजार ६०० हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्यापेक्षा जास्त लागवड झाली आहे. सर्वाधिक ६९ हजार ७२ हेक्टर क्षेत्रात लागवड शिरपूर तालुक्यात झाली आहे. त्यानंतर धुळे तालुका ६४ हजार ७१५ हेक्टर, शिंदखेडा तालुका ५३ हजार ७९० व साक्री तालुका ११ हजार ३११ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. कपाशीखालोखाल बाजरी ५२ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रात मक्याची ४७ हजार ९०४ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.
शेतकºयांनी यंदा सोयाबीन पिकालाही पसंती दिली असून त्याची २१ हजार ५२४ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. त्यानंतर मूग १८ हजार ८१४, भुईमूग ११ हजार ६१७, ज्वारी १० हजार २१३, उडीद ६ हजार ८५, तूर ५ हजार ६४६, भात ५ हजार ५७६, नागली १ हजार १३२ तर तीळ पिकाची ३८० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकंदर विचार करता कपाशी १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर, तृणधान्य १ लाख १८ हजार १२५ हेक्टर, गळीत धान्य ३३ हजार ५२४ हेक्टर व कडधान्याची ३१ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.