धुळे जिल्ह्यातील ८५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:52 AM2018-06-13T11:52:26+5:302018-06-13T11:52:26+5:30
समग्र शिक्षा अभियान : शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणे अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : समग्र अभियान अंतर्गत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ८५ हजार ७०३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. या गणवेशासाठी समग्रच्या प्रस्तावित बजेटमध्ये गणवेशाच्या निधीची तरतूदही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. ४७ हजार विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थिनींना मोफत गणवेश देण्यात येतो. जिल्ह्यातील ४७ हजार ०२ विद्यार्थिनींना याचा लाभ प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तसेच ३८ हजार ६७७ विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. त्यामध्ये एस.सी.ची २४२७, एस.टी.ची २९ हजार ३१ मुले व बीपीएलच्या ७ हजार २१९ मुलांचा समावेश प्रस्तावित करण्यात आलेला आहे. प्रत्येकी दोन गणवेश प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहेत. यासाठी प्रती गणवेश २०० रुपयाप्रमाणे दोन गणवेशांसाठी ४०० रुपये संबंधित लाभार्र्थीला मिळणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार? दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच सर्व शिक्षा अभियानाचा बजेट तयार होऊन त्याला मंजुरी दिली जात होती. त्यात गणवेशासाठी लागणारी रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा होत होती. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी बहुतांश विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळत होते. मात्र यावर्षी समग्र शिक्षा अभियानाच्या बजेटला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पैसा मिळणार कधी, तो खात्यावर जमा होणार कधी याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल का? याबाबत साशंकताच आहे.