Vidhan Sabha 2019 : प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ९०० जणं रडारवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:06 PM2019-09-24T22:06:37+5:302019-09-24T22:07:57+5:30
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे : फरार, पाहिजे आरोपींच्या माहितीचे संकलन, १६९५ बुथनिहाय बंदोबस्त
धुळे - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १७ पोलीस स्टेशन अंतर्गत १ हजार ६९५ बुथनिहाय पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे़ महापालिका आणि लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचे काम मार्गी लावण्यात आले आहे़ त्यानुसार, जिल्ह्यात ९०० जणं सध्या रडारवर आहेत़ कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बोलतांना सांगितले़
जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काय तयारी करण्यात आली किंवा करण्यात येत आहे, या संदर्भात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर मनमोकळा संवादही साधला़
प्रश्न : निवडणुकीच्या अनुषंगाने कोणावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहात का?
विश्वास पांढरे : निवडणुक असो वा सण-उत्सव यावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते़ विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असून ९०० जणं सध्या रडारवर आहेत़
प्रश्न : निवडणूक आली की अवैध दारुचा महापूर येतो, तो रोखण्यासाठी काही उपाययोजना करणार आहात का?
विश्वास पांढरे : अवैध दारु अड्यावर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई सुरु असते़ आता विधानसभा निवडणूक असल्याने परराज्यातून येणारी अवैध दारु आपल्या जिल्ह्यात येणार नाही याकडे सुरुवातीपासून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती आणि भरारी पथक सज्ज करण्यात आले आहे़ त्यांच्या माध्यमातून बारकाईने याकडे लक्ष देण्याचे काम सुरु झाले आहे़
प्रश्न : आपल्या स्तरावर निवडणूक बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे का?
विश्वास पांढरे : निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे़ प्रत्यक्ष सुरुवात झाली नसलीतरी आमच्या स्तरावर पोलिसांच्या बंदोबस्ताचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार, जिल्ह्यातील १७ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या १ हजार ६९५ मतदान केंद्रावर हा बंदोबस्त असणार आहे़ याठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जातील़ तसेच बाहेर गावाहून येणारे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था देखील केली जाणार आहे़
प्रश्न : निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरील राज्यातून काही मदत घेणार आहात का?
विश्वास पांढरे : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असल्यामुळे शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून पोलिसांची मदत घेतली जाईल़ तशा प्रकारचे नियोजन केले जात आहे़
या दोन्ही राज्यातील पोलीस अधिकाºयांची बैठक मंगळवारी घेण्यात आली़ त्यात सुक्ष्म नियोजन करुन त्यांची मदत घेतली जाणार आहे़ त्यासाठी परराज्यातील किती अधिकारी व कर्मचारी असतील याचे अंतिम नियोजन बाकी आहे़ लवकरच ते पूर्ण करुन मार्गी लावले जाईल़
प्रश्न : निवडणुकीच्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन होणार आहे का?
विश्वास पांढरे : निवडणुक शांततेत पार पाडावी यासाठी सुक्ष्म आणि गोपनीय नियोजन असणार आहे़ त्यात फिरते पथक, भरारी पथकांसह बैठे पथक देखील सज्ज राहतील़ इलेक्शन सेल देखील पोलिसांचा तयार करण्यात आलेला आहे़ काही संवेदनशिल भागांसह गावांकडे देखील पोलिसांचे लक्ष असणार आहे़ त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना शांततेसाठी प्रयत्न देखील सुरु आहे़ नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची अपेक्षा आहे़