डीपीडीसीच्या आठ जागांसाठी ९७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 06:53 PM2017-09-27T18:53:59+5:302017-09-27T18:55:20+5:30
निवडणूक : १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतमोजणी; दीड तासात निकाल येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) आठ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४६ पैकी १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात ९७.९५ टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी, सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दीड तासात निकाल हाती येण्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने व नवीन नियोजन सभागृह, अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तर सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत ९७.९५ टक्के इतके मतदान झाले.
९ पैकी एक जागा बिनविरोध
२०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार वाढीव ८ जागा, तर दोंडाईचा नगरपालिकेची (लहान नागरी मतदार संघ) रिक्त झालेली १ अशा ९ जागांसाठी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु, मोठ्या नागरी मतदार संघातून (महापालिका क्षेत्र) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हा नियोजन विभागाने जाहीर केले होते.
८० महिलांनी बजावला हक्क
डीपीडीसी निवडणुकीत ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदारांपैकी दिवसभरात १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत ६३ पुरुष व ८० महिला पदाधिकाºयांनी मतदान केले. तर ग्रामीण मतदार संघातून २ मतदार व नगरपंचायत मतदार संघातील एक मतदार मतदान करू शकले नाहीत.