हजार मुलांमागे ९२१ मुलींचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:23 PM2019-05-04T22:23:44+5:302019-05-04T22:24:01+5:30
मुलीच्या जन्मदरात घट । जनजागृती करून देखील प्रमाणात वाढ होईना !
चंद्रकांत सोनार ।
धुळे : मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात ेयेतात़ मात्र शहरात एक हजार मुलांमागे ९२१ मुली, असा जन्मदर आहे़ कायद्याचा धाक व जनजागृतीच्या अभावामुळे मुलांच्या तुलनेत मुलीेंचे प्रमाण ७९ ने कमी आहे.
शहरात लिंग गुणोत्तर प्रमाणानुसार जानेवारी ते डिसेंंबर २०१८ यावर्षात एक हजार मुलांमागे ९२१ मुलीचे प्रमाण होते़ त्यात ३ हजार ५५७ मुली तर ३ हजार ८५८ मुलांची संख्या आहे. दरम्यान मुलींच्या जन्मदरात सर्वाधिक प्रमाण याचवर्षी आॅगस्ट व डिसेंबर महिन्यात होते़ या दोन्ही महिन्यात प्रत्येकी ६९५ मुली जन्मल्या आहे.
जनजागृतीची करण्याची गरज
मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करण्याच्या मानसिकता समाजात आजही खोलवर रुजून बसली आहे़ शहरासह राज्याबाहेर जावुन छुप्या पध्दतीने गर्भलिंग चाचणी केली जाते़ कौटुंबिक पातळीपासून सामाजिक स्तरापर्यंतच्या वातावरणात मुलींच्या बाबतीत सकारात्मकता दिसून येत नाही़ त्यामुळे नवजात मुलीला फेकून देण्याच्या घटना घडतात़ प्रशासनाला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे़
शहरात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, लेक वाचवा अशा सरकारी मोहिम राबविण्यात येत आहे़ मात्र तरी देखील स्त्री पुरुष प्रमाण पाहिले असता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे शासनाची मोहिम फक्त नावालाच दिसुन येत आहे़
२२ केंद्रांवर झाली होती कारवाई
जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक सोनोग्राफी केंदे्र कार्यान्वित आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात १७ केंद्रे कार्यान्वित आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व त्रुटींमुळे २०१२ मध्ये २२ केंद्रांची मान्यता रद्द केली होती़
दक्षता समिती स्थापन
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी दक्षता कमिटी गठीत केली आहे. त्यात सहायक अध्यक्ष, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी आदींची नियुक्ती केली आहे.
जन्मदरांत तीन वर्षात वाढ
२००९ या वर्षात मनपा हद्दीत एकूण ६ हजार ३७६ मुलींनी तर २०१० मध्ये ६ हजार ९३३ मुलींनी जन्म घेतला. तसेच २०११ या वर्षी शहरात ७ हजार ८९ मुलींचा जन्म झाला, तर २०१२ मध्ये ८ हजार ९९९ मुलींनी जन्म घेतला. दरम्यान या तीन वर्षांत शहरात मुलींचा जन्मदर वाढला असल्याचे दिसते.