सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By देवेंद्र पाठक | Published: June 11, 2023 08:11 PM2023-06-11T20:11:59+5:302023-06-11T20:12:09+5:30
साक्री तालुक्यातील छडवेल येथील घटना, पोलिसांत गुन्हा
धुळे : अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून एका हॉटेल व्यावसायिकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे गावात गुरुवारी घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी दोन जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
समाधान हिरामण सोनवणे (वय ३१, रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, समाधान यांचे गावात चायनीज हाॅटेल आहे. त्यांनी व्यवसायासाठी वर्षभरापूर्वी गावातील एकाकडून २ लाख रुपये आणि दुसऱ्याकडून दीड लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. पैसो दिल्यावरही दोघे पैशांची मागणी करून दमदाटी करत होते.
गुरुवारी एक जण हॉटेलवर आला आणि ३ लाख ९५ हजार रुपये घेणे असून, तू ते आजच परत दे आणि अशी धमकी देऊन निघून गेला. तर शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एकाने मोबाइलवर संपर्क साधून समाधान तुझ्याकडे २ लाख १० हजार रुपये घेणे असून, पैसे आजच परत कर नाही तर तुला मारेल, अशी धमकी दिली.
या त्रासाला कंटाळून दुपारी दीड वाजेच्या सुमारास समाधान सोनवणे या हॉटेल व्यावसायिकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार, दोन जणांविरोधात भादंवि कलम ३८४, ३८५, ११६, ५०६, ३४, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ अन्वये, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.