कारची बैलगाडीला धडक, दोन बैल जागीच ठार; चालकावर गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: December 18, 2023 03:11 PM2023-12-18T15:11:18+5:302023-12-18T15:11:50+5:30
बेटावद-वारूळ दरम्यानचा अपघात.
अतुल जोशी, धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोर चालणाऱ्या बैलगाडीला मागून जोरात धडक दिली. या अपघातात दोन बैल ठार झाले. तर बैलगाडी चालकासह कारमधील चारजण असे एकूण पाचजण जखमी झाले. हा अपघात बेटावद-वारूळ रस्त्यावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ रविवारी दुपारी १२:४० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी कार चालकाविरूद्ध नरडाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णापूर (ता. चोपडा) येथील काहीजण ओमनी कारने (क्र.एम.एच. २०- ईई६५१३) वाघोदा (ता. शिंदखेडा) येथे लग्नाला जात होते. या कारमध्ये पाच-सहा महिला होत्या. या कारने बेटावदहून वारूळकडे जाणाऱ्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बैलगाडी काही अंतरावर फेकली गेली. धडक बसताच गाडीचे दोन्ही बैल जागीच ठार झाले. या अपघातात बैलगाडीचालक विश्वास मकड्या पावरा (वय ३५, रा. बेटावद) याच्यासह कारचालक व त्यातील तीन महिला असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी विश्वास पावरा याच्या फिर्यादीवरून कार चालक पंकज दिनकर मोरे (भिल) (रा. कृष्णापूर, ता. चोपडा) याच्याविरूद्ध नरडाणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.