चोरीचे सोने बिनधास्त वापरा, त्याचे पैसे करून मज्जा करा; हतबल शिक्षकाचं पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2024 05:01 PM2024-01-08T17:01:40+5:302024-01-08T17:02:19+5:30
तीन वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास न लागल्याने सेवानिवृत्त शिक्षकाने लिहिले चक्क चोरांनाच पत्र
भिका पाटील
शिंदखेडा (धुळे) : शहरातील एका कॉलनी परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाकडे चोरट्यांनी हातसफाई करीत सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास न लागल्याने, पोलिसांनीही ‘फाइल’बंद केली. त्यामुळे उद्दिग्न झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाने चक्क चोरांना पत्र लिहून चोरीचे सोने बिनधास्त वापरा, त्याचे पैसे करून मज्जा मारा, असे पत्र लिहिले आहे. सध्या या पत्राची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
शहरातील शिंदखेडा प्रोफेसर कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त प्रा. जी. पी. शास्त्री यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने, साड्या, देव्हाऱ्यात ठेवलेली रोख रक्कम, असा एकूण साडेचार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी त्यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. दरम्यान, तीन वर्षांत चोरीचा तपास लागला नाही. त्यांना शिंदखेडा न्यायालयातून समन्स आला की, आपण न्यायालयात हजर राहा. सेवानिवृत्त शिक्षकाला वाटले आपल्या चोरीचा काहीतरी छडा लागला असेल. मात्र सदर केस पोलिसांनी कोणताही तपास लागत नसल्याने ‘अ’ समरी म्हणून न्यायालयात पाठवली. त्यात त्या शिक्षकाने केस चालवायची नाही म्हणून कोर्टात सांगितले. मात्र चोरीबाबत त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून त्यांनी चोरांनाच पत्र लिहिले
असा आहे पत्राचा मजकूर
भावांनो, माझ्या घरात तुम्ही चोरी करून आज तीन वर्षे पूर्ण झाली. सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज आपण लांबवला. खरं तर आपल्या विरुद्ध पोलिस तक्रार करण्याची इच्छाच नव्हती, पण तक्रार केली. पोलिसांनी तुम्हाला शोध शोध शोधले, पण तुम्ही सापडलेच नाहीत. या चोरीचे टेन्शन आता तुम्ही अजिबात ठेवू नका. तुम्ही लूटलेले चार- पाच लाख रुपयांचे सोने आता तुमचे झाले आहे. बिनधास्त रहा. चोरलेले दागिने बिनधास्त वापरा..त्याचे पैसे करून वापरा..मौज करा..पण, भावांनो खरंच आनंद मिळतो का रे, असे दुसऱ्याच्या घामाचे ..कष्टाचे चोरून ? तुम्ही जर माणूस असाल तर कष्टाचे आणि घामाचे पैसे जातात नं तेव्हा काय मन:स्थिती होते हे एकदा तुमच्या आई आणि वडिलांना वेळ काढून एकदा विचारून पाहा.