खेळताना तोंडात विषारी औषधाची बाटली घेतल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 05:35 PM2023-06-12T17:35:11+5:302023-06-12T17:35:36+5:30
धुळ्यातील कुमारनगर भागात ६ मे रोजी ही घटना घडली होती.
राजेंद्र शर्मा -
धुळे : एका दीड वर्षाच्या मुलाने खेळता खेळता तोंडात एक विषारी औषधाची बाटली घेतली. त्या बाटलीचे औषध पोटात गेले. उपचार घेत असतांना त्याचा नाशिक येथे मृत्यू झाला. याप्रकरणी 11 जून रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यातील कुमारनगर भागात ६ मे रोजी ही घटना घडली होती.
शिरपूर येथील मंगल पार्क कॉलनीत राहणारा कार्तिक राहुल बावीस्कर हा दीड वर्षाचा मुलगा त्याच्या आईसोबत धुळ्यातील कुमारनगर ब्लॉक नंबर क्यू ५ रूम नंबर ६ येथे मामाकडे आलेला होता. तेथे तो खेळत असताना त्याने थिमरची उघडी बाटली ताेंडात घेतली. औषध तोंडात गेल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने साक्री रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी नाशिक येथे स्थलांतरित करण्यात आले. तेथे उपचार घेत असताना त्याचा ७ मे रोजी सायंकाळी मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक आखाडे करत आहेत.