जिल्हा कारागृहातील बंदिवानाची शौचालयात गळफासाने आत्महत्या
By देवेंद्र पाठक | Published: October 3, 2022 10:25 PM2022-10-03T22:25:33+5:302022-10-03T22:26:26+5:30
गांजा प्रकरणातील संशयित, होता न्यायालयीन कोठडीत
धुळे : जिल्हा कारागृहातील बंदिवानाने शौचालयातील खिडकीचा आधार घेऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर येथे घडलेल्या गांजा प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत होता. जामसिंग पावरा (वय ७०) असे मयत बंदिवानाचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
येथील जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर २ परिसरात शिपाई मोहन पंडित बिरारी हे गस्त घालत होते. कारागृहातील बंदिवान सलमान खान सलीमखान आणि गणेश प्रवीण सोनार यांच्यासह अन्य बंदिवानांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे ऐकून शिपायाने घटनास्थळाकडे धाव घेत पाहणी केली. त्यावेळेस बॅरेकमधील शौचालयात खिडकीला लोखंडी गजाला पांढरा रंगाचे कापड बांधून त्याच्या साहाय्याने बंदिवान जामसिंग जसमल पावरा (वय ७०, सांज्यापाडा, फत्तेपूर ता. शिरपूर) याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. यानंतर घटनेची माहिती वरिष्ठाना कळविण्यात आली. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील यांना तातडीने बाेलाविण्यात आले. त्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस शिपाई मोहन बिरारी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सकाळी सव्वाआठ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. उजे घटनेचा तपास करीत आहेत.
मयत गांजाप्रकरणातील आरोपी
शिरपूर तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर येथील जामसिंग जसमल पावरा (वय ७०) याला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० व २२ प्रमाणे शिरपूर तालुका पोलिसांनी २८ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर ३० सप्टेंबर २०२२ रोजी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.