धुळ्यात वनरक्षकांच्या निवासस्थानजवळून चंदनाचे झाड लंपास
By देवेंद्र पाठक | Published: August 16, 2023 04:41 PM2023-08-16T16:41:35+5:302023-08-16T16:41:44+5:30
देवपुरातील पुरुषोत्तम नगरात राहणारे चेतन शंकर काळे (वय ३३) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली
धुळे : शहरातील वनरक्षक यांच्या निवासस्थान येथूल ४ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड चोरट्याने लांबविले. ही घटना रविवारी रात्री घडली. चोरी झाल्याचा प्रकार सकाळी लक्षात आल्याने सोमवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील पुरुषोत्तम नगरात राहणारे चेतन शंकर काळे (वय ३३) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, वनरक्षक धुळे यांच्या निवासस्थान येथील कंपाऊंडच्या उजव्या बाजूस चंदनाचे झाड होते. या झाडासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय आवारातील चंदनाच्या झाडाचे खोड चोरट्याने लंपास केला. ही घटना रविवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली.
सर्वत्र शोध घेऊनही चंदनाच्या झाडाचे खोड चोरुन नेणारा चोरटा सापडला नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. आर. वसावे घटनेचा तपास करीत आहेत.