धुळ्याहुन मुंबईसाठी लवकरच स्वतंत्र रेल्वे धावणार, बोर्डाकडे प्रस्ताव
By सचिन देव | Published: April 3, 2023 08:12 PM2023-04-03T20:12:06+5:302023-04-03T20:12:37+5:30
सुविधा : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
धुळे : कोरोना संसर्ग निवळल्यानंतर सुरू झालेल्या धुळे-चाळीसगाव पॅंसेजरला मुंबई बोगी लागणे आता बंद झाल्यामुळे धुळेकरांची मुंबईला जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गैरसोय दुर करण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे धुळ्याहुन स्वतंत्र मुंबईला विशेष गाडी सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
पूर्वी धुळे-चाळीसगाव पॅंसेजरला धुळ्याहुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र दोन बोगी लागत होत्या. मात्र, कोरोनाकाळात धुळे पॅसेंजर बंद असल्यामुळे, ही सेवाही कोलमडली होती. त्यानंतर गेल्या वर्षांपासून चाळीसगाव-धुळे पॅंसेजर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, पॅसेंजर ऐवजी रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गावर मेमू गाडी चालविण्यात येत आहे. मेमू गाडीला मुंबई बोगी जोडणे शक्य नसल्यामुळे, धुळ्याहुन मुंबईच्या स्वतंत्र बोगी लागणे बंद झाले आहे. त्यामुळे धुळेकरांना मुंबईला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स व बसेसचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे धुळ्याहुन मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
तर धुळ्याहुन स्वतंत्र मुंबई एक्सप्रेस सुरू करा..
चाळीसगाव-धुळे पॅंसेजरला मुंबई बोगी लागणे बंद झाल्यामुळे, धुळेकरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया यांच्यांशी संपर्क साधुन, धुळ्याहुन स्वतंत्र मुंबई एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली आहे. धुळे स्टेशन हे भुसावळ रेल्वे विभागात येत असल्याने, भुसावळ रेल्वे प्रशासनाने खासदार सुभाष भामरे यांच्या मागणीचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून
रेल्वे बोर्डाला नुकताच पाठविला आहे.