ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यात एका गावाला टँकरने पाणी पुरवठा
By अतुल जोशी | Published: January 4, 2024 07:18 PM2024-01-04T19:18:44+5:302024-01-04T19:18:54+5:30
हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील बाभळी गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे.
धुळे: उन्हाळा सुरू होण्यास जवळपास दीड महिना बाकी आहे, तोच अनेक गावांना आतापासूनच पाणी टंचाईची झळ बसू लागलेली आहे. शिंदखेडा तालुक्यातील एका गावात टँकरने पाणी पुरवठा होऊ लागला आहे. तर जिल्ह्यातील २१ गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्यात आलेली आहे. आताच अशी परिस्थिती असल्याने, उन्हाळ्यात टँकरसह विहीर अधिग्रहणाचा आकडाही फुगणार हे स्पष्ट आहेे. धुळे जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला नाही. तसेच विहिरींच्या जलपातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावात विहिरींनी तळ गाठलेला आहे. कमी पावसाचा परिणाम रब्बी हंगामातील लागवडीवरही झालेला असून, यावर्षी आतापर्यंत केवळ ६८ टक्के क्षेत्रावरच पीकपेरणी झालेली आहे.
ऐन हिवाळ्यात शिंदखेडा तालुक्यातील बाभळी गावात पाण्याचा टँकर सुरू करण्यात आलेला आहे. तर जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी २१ विहिरी अधिग्रहित केेलेल्या असून, त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १ व शिंदखेडा तालुक्यातील १९ गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली आहे.