ऐन पावसाळ्यात गावासाठी पाण्याचा टँकर, सगळ्यांनाच पावसाची आतुरता
By अतुल जोशी | Published: July 14, 2023 05:46 PM2023-07-14T17:46:29+5:302023-07-14T17:46:54+5:30
जिल्ह्यात जून अखेर १४४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
धुळे : जुलैचा दुसरा आठवडा झाला तरी अद्याप धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची समस्या अजुनही भासत असून, शिंदखेडा तालुक्यातील धावडे गावासाठी गुरूवारपासून पाण्याचा टॅकर सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात जून अखेर १४४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील उर्वरित तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला असल्याने, १३ जुलै अखेरपर्यंत आता फक्त ७५ गावांसाठीच विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत. त्यामुळे या गावांना पाण्याची समस्या भेडसावत नाही. मात्र, जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही पावसाने कृपादृष्टी दाखवली नाही. त्यामुळेच, बळीराजा चिंतेत आहे, तर सर्वसामान्य गावकरीही पाण्यासाठी वणवण करत आहेत. त्यामुळेच, जिल्हा परिषदेने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.