महिलेला जाळून मारल्याप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा
By अतुल जोशी | Published: March 20, 2023 07:04 PM2023-03-20T19:04:59+5:302023-03-20T19:05:14+5:30
महिलेला जाळून मारल्याप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
धुळे : महिलेच्या अंगावर रॅाकेल टाकून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाल्याने, धुळेन्यायालयाने मुन्नीबाई सय्यद अलीम (वय ४२, रा. शिंदखेडा) हिला जन्मठेप व तीन हजार रुपये दंड ठोठावल्याची शिक्षा सोमवारी सुनावली. शिंदखेडा बसस्थानकामागे राहत असलेल्या कमलाबाई यांच्या घरात मुन्नीबाई सय्यद व वनिता ठाकरे यांच्यात जेवणावरून ७ ॲागस्ट २०१८ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद झाला.
मुन्नीबाईने घरातून रॉकेल आणून वनिता ठाकरे यांच्या अंगावर टाकत तिला पेटवून दिले. यात वनिता ठाकरे या ६४ टक्के भाजल्याने, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना २२ ॲागस्ट १८ रोजी वनिता ठाकरेचा मृत्यू झाला. मृत्युपूर्व दिलेल्या जबाबावरून मुन्नीबाई सय्यद अलीम हिच्याविरुद्ध शिंदखेडा पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी न्यायालयत दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याचे कामकाज धुळ्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय ज. मुरक्या यांनी १० साक्षीदारांचे जबाब घेतले. त्यापैकी ४ साक्षीदार फितुर झाले. सरकारी अभियोक्त्यांनी युक्तिवाद करून मृत्युपूर्व जबाबावरून आरोपीस शिक्षा देता येऊ शकते, याबाबत न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. त्यावरून न्यायालयाने मृताचे दोन मृत्युपूर्व जबाब ग्राह्य धरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने सोमवारी आरोपी मुन्नीबाई सय्यद अलीम हिला जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.