निवडणुकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील घटना
By देवेंद्र पाठक | Published: April 17, 2023 06:06 PM2023-04-17T18:06:45+5:302023-04-17T18:07:02+5:30
निवडणुकीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कुरूकवाडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरुन एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील धीरज मनोहर साळुंके (वय २१) या तरुणाने दोंडाईचा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, राजकीय द्वेषापोटी त्यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला. एकाने लाकडी दांडक्याने पायाच्या गुडघ्याखाली जोरात मारून दुखापत केली. दुसऱ्याने पाईपने छातीवर वार केला. इतरांनी हाताबुक्क्याने मारहाण केली. आमचे राजकारण संपवितो, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान १२ एप्रिल रोजी उज्वलगीर पंडीतगीर बुवा यांनी रोजगार हमी कामांची माहिती घेतली म्हणून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करत दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर चारच दिवसात हे दोन गट पुन्हा आमने सामने आले. धिरज साळुंखे याच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक विश्वेश हजारे घटनेचा तपास करीत आहेत. पोलिसांकडून जाब-जबाब घेण्याचे काम सुरु झाले आहे.