४२ लाखांची अपसंपदा जमा केल्याप्रकरणी राजेंद्रकुमार गावित यांच्या नटावद येथील घराची एसीबीकडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:26 PM2020-12-29T22:26:22+5:302020-12-29T22:27:01+5:30
अपसंपदा : पत्नीही चौकशीच्या फेऱ्यात
धुळे : मंत्रालयातील निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार कृष्णराव गावित व त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक इला गावित यांच्याविरुध्द ४२ लाखांची अपसंपदा बाळगल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस?्या दिवशी मंगळवारी नंदुरबार एसीबीच्या पथकाने नंदुरबारसह नटावद येथील घराची झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे़ या झडतीत नेमके काय मिळाले याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही़
स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या नंदुबार जिल्ह्यातील दाम्पत्य अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल केला. या दोघांनी आपल्या मिळकतीपेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपयांची अपसंपदा गोळा केल्याचे उघड झाले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापनगर येथील राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (५९) आणि त्यांची पत्नी ईला राजेंद्रकुमार गावित (५९) (मूळ राहणार नटावद, ता. जि. नंदुरबार) यांनी १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत २ कोटी ४३ लाख ८१ हजार ४६१ रुपये संपादित केले. त्यापैकी १ कोटी ६ लाख ९५ हजार ५८२ रुपयांचा खर्च केला. राजेंद्रकुमार गावित यांनी १ कोटी ७९ लाख ३५ हजार २१९ रुपयांची मालमत्ता संपादित केली. त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा ४२ लाख ४९ हजार ३४० रुपयांची म्हणजेच १७.४२ टक्के अपसंपदा धारण केली असल्याचे परीक्षणातून निष्पन्न झाले. तसेच राजेंद्रकुमार गावित यांनी पत्नी ईला राजेंद्रकुमार गावित (स्वेच्छा निवृत्त पोलीस निरीक्षक) यांनी सदरची अपसंपदा स्वत:च्या नावे धारण करून साहाय्य केल्याचे समोर आले आहे.
या दोघा अधिकाऱ्यांनी मिळविलेली मालमत्ता ही त्यांच्या उत्पन्नाशी विसंगत असल्याचे आढळून आले. चौकशीतून ही बाब प्रकषार्ने समोर आली. परिणामी दोघा सेवानिवृत्त पती-पत्नीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे (सुधारणा २०१८) कलम १३ (१) (अ), १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे घटनेचा तपास करीत आहेत.