दोंदवाड शिवारात अपघात, तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:31 PM2020-08-18T22:31:46+5:302020-08-18T22:32:16+5:30
घातपाताचा संशय : पालकांचा आरोप
विंचूर : तालुक्यातील दोंदवाड शिवारात दुचाकीचा अपघात झाल्याने बाळा उर्फ यशोदिप संजय बोरसे (२१) याचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़
धुळे तालुक्यातील शिरुड चौफुली ते बोरकुंड रस्त्याने पुढे दोंदवाड शिवारातील आशाबाई प्रताप देसले यांच्या शेताला लागून अपघाताची ही घटना घडली़ एमएच १८ एआर २००० क्रमांकाच्या दुचाकीने बाळा बोरसे हा रस्त्याने जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली़ या अपघातात बाळा फेकला गेला़ त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस जबर दुखापत झाली़ गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ सुरत येथे वास्तव्यास असलेले संजय जगन्नाथ बोरसे यांचा बाळा हा मुलगा होता़ याप्रकरणी मयत बाळाचे काका अरुण जगन्नाथ बोरसे (६०, रा़ विंचूर ता़ धुळे) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली़ त्यानुसार अज्ञात वाहनचालका विरुध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ प्रमाणे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे घटनेचा तपास करीत आहेत़
दरम्यान, ऐन पोळा सणाच्या दिवशीच अपघाताची ही दुर्देवी घटना घडल्याने विंचूर गाव व परिसरात शोककळा पसरली़ बाळा याचा अपघात नसून घातपात असल्याचा पालकांचा आरोप आहे़ त्यामुळे बाळा याची कोणाशी दुश्मनी होती का, या दृष्टीने पोलीस तपास सुरु आहे़