मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक उलटून अपघात सोनगीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:06 PM2019-09-17T23:06:40+5:302019-09-17T23:06:57+5:30
वाहनांच्या लागल्या रांगा
सोनगीर : मुंबई आग्रा महामार्गावरील टोलप्लाझाच्या पुढे काही अंतरावर सरवड गावाच्या शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रक उलटल्याने महामार्गावर वाहनांची रांग लागली होती.
मध्यप्रदेश राज्यातून येणारा एम.एच.१८ बी.जी. ३६२० क्रमांकाचा ट्रक किराणा माल असलेल्या वस्तू घेऊन सोनगीरकडून धुळेकडे जात होता. दरम्यान, सरवड शिवारात व धुळे पळासनेर टोलप्लाझाच्या काही अंतरावर मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास अचानक रस्त्यात तीन ते चार कुत्रे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारला त्यात ट्रक महामार्गावर उलटला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. ट्रक रस्त्यातच आडवा पडल्याने काही वेळ सोनगीरकडून धुळेकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जवळच असलेल्या टोलप्लाझावरील कर्मचारी सुमित शिंदे, श्रीकेश पाटील, गोविंद सोनवणे, डॉ.प्रसाद मोरे, ठाणसिंग ठाकरे व पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
अपघातानंतर दुसºया दिवशी मंगळवारी दुपारपर्यंत ट्रक महामार्गाच्या बाजूला पडून होता. अपघात झाल्याची माहिती ट्रक चालक राजु शांतीलालजी नयमा (वय ४०) रा राजोद ता.सरदारपूर जि.धार याने सोनगीर पोलिसांत दिली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात मोटार अपघात नोंद करण्यात आली आहे.