अनोळखी भिक्षेकरूच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा; एक माहीती ठरली पुरेशी अन् फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:00 PM2022-02-25T17:00:10+5:302022-02-25T17:00:44+5:30
मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भिक्षूकाचे दोन तीन दिवसापूर्वी मोहाडी गावातील राहणारे संजय पखाले यांच्याशी जोरदार भांडण झाले होते.
धुळे: २०फेब्रुवारीच्या पहाटे मोहाडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली कृषी विद्यालयाच्या भिंती लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर ५५ ते ६० वयातील अज्ञात भिक्षेकरूचा अज्ञात आरोपींकडून दगडाने चेहरा ठेचून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने धुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच पोलिस पथके या ठिकाणी दाखल होऊन या खूनाचा तपास सुरू केला. मात्र कुठलाही पुरावा नसताना तपास यंत्रणेला अनेक अडथळे निर्माण होत होते.
मोहाडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भिक्षूकाचे दोन तीन दिवसापूर्वी मोहाडी गावातील राहणारे संजय पखाले यांच्याशी जोरदार भांडण झाले होते,अशी माहिती मिळताच पोलिसांनी संजय पखाले यांचा शोध सुरू केला. त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली असता संजय पकाले ही घटना घडल्याच्या दिवसापासून घरी आलेले नाहीत, अशी माहिती मिळाल्यावरून पोलिसांचा संशय पक्का झाला.
मोहाडी पोलिसांनी संजय पखाले यांचा शोध वेगाने सुरू केला. संशयित आरोपीचा मुलगा प्रतीक पखाले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सदर खून त्याचे वडील संजय पखाले व त्याचा मित्र आकाश बोरसे सर्व राहणार मोहाडी यांनी मिळून केल्याची कबुली दिल्याने मोहाडी पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.
मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून आरोपीने त्याचा मुलगा व मुलाचा मित्राला सोबत घेऊन त्या दिवशी भिक्षेकरूची मारहाण करत दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याने तीनही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली.