ऐन हिवाळ्यात धुळे जिल्ह्यातील २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित
By अतुल जोशी | Published: December 22, 2023 05:45 PM2023-12-22T17:45:17+5:302023-12-22T17:46:12+5:30
ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यात २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
अतुल जोशी,धुळे : ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. जिल्ह्यात २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर चुडाणे गावासाठी सुरू असलेला पाण्याचा टँकर तूर्त बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.
धुळे जिल्ह्याची पावसाची सरासरी ५८८.७ मिमी एवढी असून, सप्टेंबर २०२३ अखेर ४६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची टक्केवारी ७९ एवढी आहे. यावेळी जवळपास २१ टक्के पाऊस कमी झाला. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील जलपातळीत सरासरीच्या तुलनेत ०.८० मीटरने घट नोंदविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील १ व शिंदखेडा तालुक्यातील १९ अशा एकूण २० गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात अधिग्रहित विहिरींची संख्या वाढणार आहे.