धुळ्यात ४६ वीज चोरांवर कारवाई
By admin | Published: July 29, 2016 07:22 PM2016-07-29T19:22:13+5:302016-07-29T19:22:13+5:30
पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथील ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली.
पिंपळनेर : पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथील ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली. संबंधित वीज चोरांवर महावितरण कंपनीच्या पथकाने कारवाई केली असून संबंधितांचे वीज मीटर जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथे रोहित्र जळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले होते. तसेच येथील काही ग्रामस्थ अनधिकृतपणे हिटर व शेगडीचा वापर करत होते. वीज चोरीचे प्रमाणही वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी प्रतिबंधक मोहीम धमनार गावात राबविण्यात आली.
दंडात्मक कारवाई होणार
महावितरण कंपनीचे पथक धमनार येथे गेले. तेव्हा ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात वीज नियामक सन २००३ च्या कायद्यानुसार कलम १३५ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधितांना २ लाख ५० हजार दंडात्मक वीज बिल वसूल केले जाणार आहे. या मोहिमेत कार्यकारी अभियंता संजय सगर (ग्रामीण), उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील, सहायक अभियंता टी. डी. माळी, व्ही. ए. देवरे (छाईल), ए. वाय. रामटेके (सामाडे), कनिष्ठ अभियंता पी. ए. घोलप (पिंपळनेर), डी. एस. पवार, वाय. एस. खैरनार यांनी गावात घराची पाहणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
धिंगाणा घालणाऱ्या
३ जणांवर गुन्हा दाखल
वीज चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी येथील घरांमधून हिटर, शेगडी, मीटर जप्त केले. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर जप्त करण्याची कारवाई सुरू असताना गावातील रवींद्र अभिमन मोरे, बन्सीलाल नारायण धनगर, सुभाष गंगाधर बच्छाव यांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी धिंगाणा घातला. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पथकाने जप्त केलेले १४ मीटर त्यांच्या गाडीतून हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार योगेश आनंदा खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तीन जणांवर कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे व तसेच भारतीय विद्युत कायदा १३८, १३९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.