धुळ्यात कृषी विद्यापीठासाठी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:02 PM2018-01-01T16:02:32+5:302018-01-01T16:04:46+5:30
शासनाने नेमलेल्या डॉ.थोरात, डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अमलबजावणी करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘स्मरण धरणे आंदोलन’ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. त्याचबरोबर शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी केले होते.
निवेदनात म्हटले आहे की, १९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकारी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाक प्राधान्यक्रमावर आहे.
गेल्या २१ जानेवारी १६ रोजी सर्व महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागणी तीव्र असल्याचे दर्शवून दिले. तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्याची एकमुखी मागणी केली आहे.
आघाडी व युती शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात धुळ्याचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही अहवालांची अंमलबजावणी करून, धुळे जिल्ह्यात लवकरात लवकर कृषी विद्यापीठ स्थापन करावे, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कृषी विद्यापीठाची घोषणा व्हावी, अशी मागणी केली.
राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. विद्यापीठाचे मुख्य लक्ष राहुरी, पुणे, कोल्हापूरकडे आहे. यामुळे या विभागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरीता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे.
खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचा बराच भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे कोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे असेही निवेदनात म्हटले आह.
यावेळी अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, यशवर्धन कदमबांडे, नाना कदम, पंकज गोरे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.