तंबाखू खाणाºया शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 05:58 PM2018-06-06T17:58:45+5:302018-06-06T17:58:45+5:30
धुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला इशारा
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तंबाखू न खाण्याच्या सूचना देऊनही काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तंबाखू खातच असतात. मात्र आता यापुढे तंंबाखू खाणाºया शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी फौजदारी व दिवाणी खटल्यांसाठी तयार रहावे, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिला.
जागतिक तंबाखू विरोधी सप्ताहाचा समारोप आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. बी. एन. वाघ, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, अजय पिळवणकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शैक्षणिक संस्थांपासून शंभर यार्ड म्हणजे किमान तीनशे फूट परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे. त्यानंतरही या परिसरात कुणी तंबाखू विक्री करीत असेल, तर पुढील आठवड्यापासून महसूल, पोलिस, आरोग्य, शिक्षण विभागाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल.
मोहन देसले यांनी जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये दंत तपासणी घेतली जाईल असे सांगितले. तर मनपातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांना दिल्या आहेत.