धुळे जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचे समायोजन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:40 AM2019-06-19T11:40:16+5:302019-06-19T11:41:23+5:30
शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही शिक्षण विभागाकडून समायोजनाकडे दुर्लक्ष
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील ५५ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीने ६३ शिक्षक जिल्ह्यात आलेले आहेत. शाळा सुरू झाल्या तरी शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही.
शनिवारी जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पारित केले. यात धुळे तालुक्यातील ६४, साक्री तालुक्यातील १५०, शिंदखेडा तालुक्यातील ५७ व शिरपूर तालुक्यातील ७९ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यात संवर्ग १च्या ८१, संवर्ग-२च्या ५७, संवर्ग ३च्या चार, व संवर्ग४ मध्ये २०८ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. बदली प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने पार पडली असली तरी, यात जवळपास ५५ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्यांना त्याच दिवशी कार्यमुक्ततेचे आदेश देण्यात आले. बदली झालेले शिक्षक नवीन शाळेत सोमवारपासून रूजू झालेले आहेत. बदली होऊन आलेले व विस्थापित झालेले शिक्षक दोघेही एकाच शाळेवर कार्यरत आहेत.
विस्थापितांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसतांना आंतरजिल्हा बदलीने बाहेरच्या जिल्ह्यातून ६३ नवीन शिक्षक जिल्ह्यात आलेले आहे. त्यामुळे विस्थापित व आंतरजिल्हा बदलीने आलेले अशा एकूण ११६ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जोपर्यंत विस्थापितांचे समायोजन होत नाही, तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शाळा देता येणार नाही असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पदवीधरांच्या जागेवर समायोजन करावे
दरम्यान विस्थापितांच्या संदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात २८ मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग २ व ४ मधील विस्थापित शिक्षकांना समुपदेशनाने समानीकरणाच्या रिक्त जागेवर अथवा विषय शिक्षकांच्या रिक्त जागेवर पदस्थापना द्यावी अशी मागणी केलेली आहे.
धुळे तालुक्यात २३ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. त्यापैकी तालुक्यात २२ पदवीधरांच्या जागा रिक्त असून, त्या जागी विस्थापित शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल असे आश्वासन सीईओंनी दिल्याचे शिक्षक समितीचे म्हणणे आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, बापू पारधी, विश्वनाथ सोमवंशी, विक्रम पाटील, रमेश पाटील, आनंद होलारे, भटू पाटील, योगेंद्र झाल्टे, सुनील वारे, देवीदास पाटील आदींची नावे आहेत.