दारुसाठी ज्येष्ठ नागरिकांचे प्रशासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 12:15 PM2020-05-07T12:15:35+5:302020-05-07T12:15:52+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आठवड्यातून एकदा दारु दुकान उघडण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दारुसाठी ज्येष्ठ नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़ परवानाधारक ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक सेवनासाठी विदेशी दारु उपलब्ध करुन द्यावी, अशी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे़
अखील भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि धुळे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विश्वासराव भदाणे यांनी पाच मे रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, काही ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने निरोगी जीवन जगण्यासाठी प्रशासनाकडून वाईन सेवन परवाना घेतलेला आहे़ त्यासाठी नियमानुसार शासनाला फी अदा केली आहे़ त्यामुळे आम्हाला वाईन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाने पार पाडावी़ आतापर्यंत औषध म्हणून मर्यादीत प्रमाणात आम्ही वाईन घेत आहोत़
परंतु कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वाईन शॉप बंद आहेत़ सैनिक शॉपमार्फत पोलिसांच्या उपस्थितीत आम्हाला वाईन उपलब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
निवेदन देताना व्ही़ टी़ देवरे, युवराज मंडाले, संतोष सूर्यवंशी, भगवान पाटील, गुलाबराव पाटील, लहू पाटील, साहेबराव देसाई, आऱ एल़ पाटील, वासुदेव भदाणे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, अशी माहिती प्राचार्य भदाणे यांनी दिली़
तत्पूर्वी प्राचार्य भदाणे यांनी १६ एप्रिल रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या १६ कोटी आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करीत घरात थांबून आरोग्य सांभाळत आहोत़ बाहेर फिरायला पायात त्राण नाही; पण डोकी शाबूत आहेत़ अनेक अनुभवांच्या संग्रहामुळे कोरोनाची भिती न बाळगता खंबीरपणे लढा देत आहोत़ देशाचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रसारमाध्यमांच्या सूचनांचे पालन करुन पथ्य पाळत आहोत़ त्यामुळे आमच्या काही किरकोळ मागण्या मान्य कराव्यात़ त्यात लॉकडाउनच्या काळात गरीब विधवा, अपंग यांचे श्रावणबाळ योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पेन्शन मिळाले नाही़ त्यामुळे औषधे घेता आली नाहीत़ ते त्वरीत मिळावे़ मध्यमवर्गीय सेवानिवृत्त पेन्शनर यांचेही मार्च महिन्याचे पेन्शन मिळावे़
काही ज्येष्ठ नागरीकांचे वय ७५ च्या पुढे आहे़ त्यातील काहींनी वाईन सेवन करण्याचा परवाना शासनाकडून घेतला आहे़ दुकाने बंद असल्यामुळे वाईन घेता येत नाही़ त्यामुळे मानसिकता बिघडली आहे़ मेंदू विकाराने प्रकृती बिघडू नये, काही बरे वाईट होवू नये याकरिता आठवड्यातून एक दिवस एक तास एखादे दुकान पोलिसांच्या उपस्थितीत सुरू करावे़ आम्ही आमच काळजी घेत आहोतच़ कारण आमची सकारात्मक विचारशक्ती दांडगी आहे़ राहिलेले आयुष्य चांगले जगणार आहोत़ पण शासनानेही आमची काळजी घ्यावी़ पेन्शन वेळेवर द्यावे, वाईन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़ शिवाय कोरोना विरुध्दची लढाई आपण जिंकूच, असा आत्मविश्वास प्राचार्य भदाणे यांनी व्यक्त केला आहे़
एकीकडे ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राची संपत्ती आहे असे म्हटले जाते आणि दुसरीकडे याच ज्येष्ठ नागरीकांच्या किरकोळ मागण्या मान्य केल्या जात नाहीत हे दुर्दैवी आहे़ वेळेवर पेन्शन द्यावे़ वाईन उपलब्ध करुन द्यावी़ अशी आमची मागणी आहे़ - विश्वासराव भदाणे, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरीक संघ
शहरात संपूर्ण लॉकडाउनमुळे दारु दुकाने बंद
लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यामध्ये दारु दुकाने सुरू करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते़ त्यानुसार दुकाने सुरू झाली आहेत़ परंतु दुकाने सुरू किंवा बंद करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत़ परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी निर्णय घेवू शकतात़ धुळे शहरात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे़ शिवाय या शहरात तीन प्रतिबंधित क्षेत्र चार आहेत़ शिवाय संपूर्ण लॉकडाउनची मुदत दहा मेपर्यंत वाढवली आहे़ त्यामुळे धुळे शहरातील दुकाने बंद आहेत़ जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र दुकाने सुरू झाली आहेत़