फेरमूल्यांकनाचा आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:54 PM2018-01-29T15:54:27+5:302018-01-29T15:55:52+5:30
जिल्हा प्रशासन : अधिका-यांनी केली कागदपत्रांची पडताळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांच्या निधनानंतर शासनाने औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत केलेली १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करत प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा गतिमान झाली. त्यानुसार विखरण, मेथी (ता.शिंदखेडा) येथे संपादीत केलेल्या जमिनींच्या कागदपत्रांची पडताळणी अधिकाºयांनी केली. त्याचा अहवाल मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.
विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांची औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी गट क्रमांक २९१/१, २९१/२ ही जमीन संपादीत करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी त्यांना अगदी तुटपुंजे पैसे देण्यात आले. त्यामुळे धर्मा पाटील हताश होते. त्यानुसार त्यांनी प्रशासकीय व शासनस्तरावर न्याय मागण्यासाठी अनेकदा पाठपुरावाही केला होता. परंतु, दखल घेतली जात नसल्यामुळे गेल्या सोमवारी त्यांनी मुंबईत मंत्रालयात जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता.
३० दिवसात कार्यवाही; योग्य मोबदला देण्याचे आश्वासन
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळाल्याशिवाय पार्थिव उचलणार नाही; असा पवित्रा घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना लेखी पत्र दिले. त्यात औष्णीक प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या १९९ हेक्टर क्षेत्र जमीनीचे फेरमूल्यांकन करून या प्रकरणाची पुढील ३० दिवासत कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी शासनाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार योग्य तो मोबदला देण्यात येईल; असे म्हटले आहे.
शासन आदेशानुसार औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादीत केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविणार आहोत.
- डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी