धुळे जिल्ह्यात ११ वीसाठी २२ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:47 AM2018-06-15T11:47:39+5:302018-06-15T11:47:39+5:30
सर्व व्यवस्थापनाच्या २५ हजार ६०० जागा, पहिली यादी २९ रोजी लागणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया येत्या २२ जून पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २५ हजार ६०० जागा आहेत. प्रवेशाची पहिली यादी २९ जून रोजी लागणार आहे.
दहावीचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे. जिल्हयातील ६३ केंद्रावर एकूण २९ हजार ९८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ८७.५१ टक्के एवढी आहे.
दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना ११वीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी ११वीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जिल्हयातील धुळे शहर, ग्रामीण,साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात सर्व व्यवस्थापनाच्या कला शाखेच्या एकूण प्रवेश क्षमता १३ हजार २४० आहे. तर विज्ञानाची प्रवेश क्षमता १० हजार ८०, वाणिज्य शाखेची १ हजार ४०, संयुक्त १ हजार २४० अशा एकूण २५ हजार ६०० जागा आहेत. जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज २२ ते २६ जून दरम्यान वितरीत करायचे आहेत. २९ रोजी संवर्गनिहाय अर्जाची छाननी करण्यात येईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सवंर्गनिहाय पहिली गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.३ जुलै १८ पर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. त्यानंतर दुसरी व तिसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.ही प्रवेश प्रक्रिया ९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. १६ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच जेथे जादा कनिष्ठ महाविद्यालये आहेत, तेथे एक मार्गदर्शन केंद्र उघडून ज्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना रिक्त जागा कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात आहे, याची माहिती द्यावी असेही पत्रात नमूद केलेले आहे.