तब्बल २० वर्षानंतर चोरलेले सोने, चांदीचे दागिने परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:01 PM2020-01-07T23:01:13+5:302020-01-07T23:01:34+5:30
अग्रवाल नगरातील घटना : न्यायालयीन आदेशानंतर अंमलबजावणी
धुळे : मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील मुद्देमाल आझादनगर पोलिसांनी जप्त केला़ त्यात ३४़५० ग्रॅम सोने आणि ७५० ग्रॅम चांदीचा असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांना परत करण्यात आला़ दरम्यान, दागिने परत मिळाल्यामुळे नारायण अग्रवाल यांनी आझादनगर पोलिसांचे आभार व्यक्त केले़
शहरातील मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात नारायण मदनलाल अग्रवाल यांचे निवासस्थान आहे़ ते कुठेतरी बाहेर गावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते़ चोरट्याने ही संधी साधून त्यांचे घर फोडले होते़ ही घटना तब्बल २० वर्षापुर्वी घडली होती़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केले होते़ त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर मिळालेल्या पोलीस कोठडीत त्यांना पोलीसी खाक्या दाखविण्यात आला़ त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ३४़५० ग्रॅम वजनाचे सोने आणि ७५० ग्रॅम वजनाची चांदीची लगड असा मुद्देमाल आझादनगर पोलिसांनी जप्त केला होता़ याप्रकरणी न्यायालयीन कामकाज सुरु असल्यामुळे हा मुद्देमाल पोलिसांकडे सुरक्षितपणे होता़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी मुद्देमाल निर्गती करण्याच्या सूचना आझादनगर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या होत्या़ त्यानुसार न्यायालयात पाठपुरावा करण्यात आला़ परिणामी न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण मदनलाल अग्रवाल (रा़ अग्रवाल नगर, धुळे) यांच्याकडे हा मुद्देमाल सुपुर्द करण्यात आला़ यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस कर्मचारी दगडू कोळी, चेतन सोनवणे उपस्थित होते़