१३ वर्षानंतर अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:12 PM2019-09-07T12:12:34+5:302019-09-07T12:13:17+5:30
धरणाचे दोन दरवाजे उघडले : १४८३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग, दोंडाईच्यात नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
मालपूर/दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तब्बल १३ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला असून ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे अमरावती नदीला पूर आला आहे.
मालपूर येथील अमरावती व नाई नदीवर अमरावती मध्यम प्रकल्प असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ८ वाजेला धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने व रात्री १२ वाजेच्या सुमारास ०.३० मीटरने उघडण्यात आले. या अनुषंगाने एकूण १४८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग अमरावती नदीपात्रात करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर अधिक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे प्रकल्पस्थळी लक्ष ठेऊन असलेले पाटबंधारे विभागाचे अभियंता जे.एम. शेख व प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, दोंडाईचा, दाऊळ, मंदाणे, झोतवाडे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रकल्पातील पाणी पातळी २२५.६० मीटर ९५० एम.सी.एफ.टी. जलसाठा होता. पाणी सोडल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेला २२५.३५ एवढा जलसाठा दिसून आला. २२५.२० लेव्हल आल्यावर परिस्थितीनुसार पाण्याचा अंदाज घेऊन हा विसर्ग थांबविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. पुन्हा आवक वाढल्यास विसर्ग करण्यात येईल.
या प्रकल्पाची पूर्ण संचय पाणी पातळी २२५.७० असून १० सप्टेंबर नंतर एवढा पाणी साठा केला जाणार आहे. यामुळे २६०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
दोंडाईच्यात नदीला पूर
प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने दोंडाईचा शहरातून जाणाºया अमरावती नदीला १३ वर्षानंतर प्रथमच पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी शहवासीयांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या पुरामुळे १३ वर्षापूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या. सप्टेंबर २००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. परिसरातील तापी, अमरावती, भोगावती, बुराई नदीला पूर आला होता.
दोंडाईच्यात अमरावती व भोगावती नदीला पूर आला होता. त्यात नदी काठावरील ३० टपºया, २ बैल वाहून गेले होते. तसेच लाखो रुपयांची वित्तहानी झाली होती. या पुरावेळी सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे या पुरात ठाकूर गल्लीत वास्तव्यास असलेले विजय राघो वाडीले व महादेव मंदिरातील पुजारी वाहून गेले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
अमरावती नदीकाठी विजय वाडीले यांची पानटपरी होती. पानटपरीत असलेला गल्ला वाहून जाऊ नये म्हणून ते गल्ल्यावर बसून होते. दरम्यान, पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यात वाडीले वाहून गेले होते. अमरावती नदीच्या पुलावरून पाणी गेले होते. त्यावेळी पाण्यात दोर फेकून पुरग्रस्तांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले होते.
आता १३ वर्षानंतर प्रथमच अमरावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. अनेकांनी पहिल्यादांच नदी वाहत असल्याचे पाहत असल्याचे सांगितले.
तहसीलदार सुदाम महाजन यांनी आॅडीओ क्लिप व दोंडाईचा नगरपालिकेचे बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत यांनी लाऊड स्पीकरवरून नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. काही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलीस अमरावती पुलावर थांबून होते.