कचरामुक्त शहराची संकल्पना वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:46 AM2018-12-24T11:46:01+5:302018-12-24T11:46:26+5:30
महापालिका : २५ कोटींच्या ‘डीपीआर’ नंतरही कार्यवाही होईना, कचरा संकलनासह प्रक्रिया आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेने एकिकडे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ची तयारी सुरू केली असली तरी दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता असते़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात कचराकुंड्या ओसांडत असल्याचे दिसून आले़ त्यामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना सध्या वाºयावर असून त्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे़
नियमित कचरा संकलन नाही
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मनपाकडून सुरू असून शहर हगणदरी मुक्त झाल्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे शासनाने मंजूर केलेल्या २५ कोटी रूपयांच्या ‘डीपीआर’मधून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलन व प्रक्रिया करणे आवश्यक आहे़ परंतु त्यासंदर्भात कोणतीच ठोस कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही़ शहरात अनेक भागात कचरा संकलन नियमित होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते़
संकलित कचरा टाकणार कुठे?
मनपाच्या जुन्या इमारतीलगत रस्त्यावर कचरा टाकल्याचे दिसून येते़ तर बारापत्थर, साक्री रोड, देवपूरातील वाडीभोकर रोड, नकाणे रोड, मुस्लिमबहूल वस्त्यांसह हद्दवाढीतील गावांमध्येही कचºयाची समस्या आहे़ शिवाय संकलित केलेला कचरा टाकण्यासाठीही जागा उपलब्ध नसून कचरा डेपो पूर्ण क्षमतेने भरला आहे़ त्यामुळे कचरा संकलनासह साचलेल्या कचºयावर प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे़ नियमित कचरा संकलन होत नसल्याने अनेक ठिकाणी नागरिक कचरा जाळतात़
या बाबींची आवश्यकता
कचरामुक्त शहराचे तारांकीत मानांकन ठरवितांना १० उपांगे विचारात घेतली जाणार आहेत़ त्यात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, कचºयाचे जागीच विलगीकरण, सार्वजनिक-रहिवासी भागातील साफसफाई, मलनिस्सारण व नदी नाल्यांचे पृष्ठभाग स्वच्छ करणे, कचरा पेट्या व पदार्थ पुर्नप्राप्ती सुविधा, कचरा निर्माण करणारे व रहिवाशी कल्याण संघ यांच्याकडून नियमांचे पालन, कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, बांधकामे, अस्वच्छतेबाबत दंड, शुल्क आकारणी व प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण, कचºयाच्या ढिगांचे निर्मुलन, गटारी व नैसर्गिक जलसाठ्यांची स्वच्छता, कालानुरूप कचरा निर्मितीचे प्रमाण वाढविणे व शहर सौंदर्यीकरण या बाबींचा समावेश असणार आहे़
महासभेत होणार ठराव
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासनाने स्वच्छता, हगणदरी मुक्तीसाठी विविध प्रयत्न होतात़ पण स्वच्छतेचा दर्जा कायम राहावा यासाठी शासनाने महापालिकांना नामांकने देण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र तत्पूर्वी महापालिकेला धुळे शहर कचरामुक्त व स्वच्छ झाल्याचा ठराव महासभेत करावा लागणार आहे़ संबंधित विषय महासभेत सादर झाला होता पण निवडणूक जाहीर झाल्याने महासभा रद्द झाली होती़