‘आयएमए’नंतर ‘सीए’ संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान धुळ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:23 PM2019-02-12T22:23:12+5:302019-02-12T22:23:36+5:30
प्रफुल्ल छाजेड : दिल्लीत स्विकारला पदभार, कुटुंबियांमध्ये आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील मुळ रहिवासी आणि प्रा़ पी़ के़ छाजेड यांचे चिरंजीव सीए प्रफुल्ल छाजेड हे नवी दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या अखिल भारतीय सीए इन्स्टिट्युटच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले़ छाजेड यांच्या रुपाने आयएमए या आरोग्य संघटनेनंतर सीए संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा मान धुळ्याला मिळाला आहे़ दरम्यान, त्यांची निवड होताच कुटुंबियांसह त्यांच्या धुळ्यातील मित्र परिवारांनी आनंद व्यक्त केला़
धुळे शहरासारख्या राज्याच्या एका टोकाला असलेल्या छोट्या शहरातील व्यक्तिची राष्ट्रीय पातळीवरील बहुमानाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाली आहे़ अखिल भारतीय सीए इन्स्टिट्युटचे संपुर्ण देशात ३ लाख सीए सदस्य आहेत़ तर १० लाख विद्यार्थी या संस्थेशी निगडीत आहेत़ अखिल भारतीय सीए इन्स्टिट्युटच्या संपूर्ण देशात १९५ तर परदेशात ३४ शाखा आहेत़ अशा संस्थेवर काम करण्याची संधी धुळेकर असलेल्या प्रफुल्ल छाजेड यांना मिळाली आहे़
यापुर्वी त्यांनी सीए इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष पद तसेच वेस्टर्न झोनचे अध्यक्षपदही भूषविले आहे़ गेल्या १५ वर्षापासूून विविध वर्तमानपत्रामध्ये ते अर्थ साक्षरतेच्या संदर्भात लेखन करीत आहेत़ याशिवाय विविध वृत्त वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी चर्चासत्रांमध्ये अर्थ विषयक तज्ञ म्हणूनही सहभाग नोंदविलेला आहे़
सीए प्रफुल्ल छाजेड यांच्या निमित्ताने प्रथमच धुळ्यातील व्यक्तिीला अखिल भारतीय स्तरावर संधी मिळाली आहे़ धुळ्यातील पालेशा वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ़ पी़ पी़ छाजेड यांचे ते बंधू आहेत़ त्यांना एक बहिण आहे़ त्यांच्या मुलीला त्यांनी सीए बनविले आहे़ धुळ्यातील बिपीन जैन हे त्यांचे जवळचे मित्र असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांनाही अभिमान आहे़