भावाच्या निधनानंतर दीराचा भावजयीशी विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:55 AM2019-07-09T11:55:31+5:302019-07-09T11:56:00+5:30
कापडणे : चिमुकल्याला मिळाले पितृछत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : भावाच्या निधनानंतर दीराने विधवा भावजयीचा पत्नी म्हणून स्विकार केला. यामुळे चिमुकल्या आरव यालाही पितृछत्र मिळाले आहे.
धुळे तालुक्यातील कापडणे येथील बोरसे गल्लीतील रहिवासी दगाजी रतन (बोरसे) पाटील यांचा विवाहित मोठा मुलगा गणेश दगाजी पाटील (२७) हा वीज महावितरण कंपनीत लाईनमन म्हणून सिन्नर येथे नोकरीला होता. १३ जून रोजी त्यांचा सायखेडा येथे काम करीत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत गणेश पाटील याचा दीड ते दोन वषापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्याचा आरव पाटील हा मुलगा होता. या घटनेने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान, कापडणे येथील सबस्टेशनमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असलेला चेतन दगाजी पाटील (२४) याने पुढाकार घेऊन आपल्या मोठ्या भावाच्या विधवा पत्नी रोहिणी पाटील हिचा पत्नी म्हणून स्विकार केला. यामुळे चिमुकल्याला पितृछत्र लाभले. रविवारी ७ जुलै रोजी कुलदेवता जोगाई माता मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरसे, सुरेश बोरसे, माधवराव बोरसे, दगाजी बोरसे, शुभम बोरसे, कैलास बोरसे व नातेवाईकांनी विशेष प्रयत्न केले.