तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर लागला तळघराचा सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:45 PM2019-03-03T22:45:38+5:302019-03-03T22:46:13+5:30
९ लाखांचा भांग जप्त प्रकरण : जमिनीवर काठी ठोकल्याने लागला तळघराचा तपास
लोकमत क्राईम स्टोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बिलाडी रोडवरील एका शेतात तळघर करुन त्यात भांग लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचाºयांच्या पथकाने जमिनीतील तळघर शोधण्यासाठी काठीचा आधार घेऊन तब्बल साडेतीन तास मेहनत घेतली आणि काम मार्गी लावले़
गेल्या वर्षापासून गांजा आणि भांग यांच्या कारवाई मागच्या वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक झाल्या आहेत़ भांग, गांजा कुठून येतो, कुठे जातो याच्या मागावर धुळे पोलीस दल होते़ यासंदर्भात पोलिसांना शोध घेऊन तपास लावण्याच्या सूचना यापुर्वीच देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेला भांग लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, बिलाडी रोडवरील त्या शेतात भांग लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पहिल्यांदा शोध घेण्यात आला होता़ त्यात यश मिळाले नाही़ त्यानंतर पुन्हा शोध कामाला सुरुवात करण्यात आली़ बिलाडी रोडवरील एका शेतात कुंपन करण्यात आले़ ही जागा सुमारे ७ एकर इतकी आहे़ या जागेत कुठेतरी तळघर असून त्यात भांगचे पोते असल्याची माहिती अधिकृत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तळघराच्या शोध कामाला सुुरुवात केली़
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या कामाला प्रारंभ करण्यात आला़ जमिनीवर काठीने ठिकठिकाणी टोचण्यात येत होते़ तर काही ठिकाणी पाय देखील आपटण्यात येत होते़ त्याद्वारे जमिनीचा काही भाग भुसभुशीत आहे का, याची पडताळणी केली जात होती़ जागा मोठी असल्याने आणि नेमके ठिकाण माहित नसल्याने तळघराचा शोध लावण्यात उशिर होत होता़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुंपनामधील एका बाजुला काहीतरी खोलगट असल्याचा भास जाणवला़ क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी काही मजुरांची मदत घेऊन माती बाजुला सारण्यास सुरुवात केली़ अवघ्या अर्धा फुटावर लोखंडी झाकण असल्याचे आढळून आले़ झाकण उचकविल्यानंतर ७ ते ८ फुट खोल आणि अंदाजे २० बाय १५ अशी खोली सापडली़ त्या खोलीत शिडीचा आधार घेऊन तपासणी केल्यानंतर त्यात ९ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० कोरड्या भांगच्या गोण्या आढळून आल्याने पोलिसांची शोध मोहिम संपली़
वर्षभराची स्थिती
सन २०१८ मध्ये गांजा आणि भांग प्रकरणी ९ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत़ त्यात ११ आरोपींचा समावेश आहे़ त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख ६४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
फेब्रुवारी २०१९ अखेर गांजा आणि भांग प्रकरणी ४ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत़ त्यात ६ आरोपींचा समावेश आहे़ त्यांच्याकडून १९ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला़
एनडीपीएसनुसार कारवाई़