पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:08 PM2019-03-11T13:08:16+5:302019-03-11T13:09:15+5:30
धुळे लोकसभा मतदारसंघ
राजेंद्र शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण या मतदारसंघातूनच भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आणि काँग्रेसतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी महाराष्टÑात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे तर काँग्रेसतर्फे ज्येष्ट नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असून दोघांनी आधीच आपला प्रचार सुद्धा सुरु केला आहे. दोघी पाटीलद्वयी मधील ही लढत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे.
भाजपचे खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे केंद्रात धुळ्याचे प्रतिनिधीत्व करतात. जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील आतंकी हल्याच्या घटनेनंतर लगेच दोन दिवसातच सभा घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातूनच राज्यात लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी यावेळी मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गाच्या कामात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच सुलवाडे - जामफळ - कनोली या सिंचन योजनेसहीत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. शिवसेना - भाजप युती झाल्याने निवडणुकीत मत विभागणीचा प्रश्नही सुटला आहे.
मात्र दुसरीकडे भाजपचे धुळे शहर आमदार अनिल गोटे यांनी मात्र डॉ.भामरे यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर करुन पक्षासमोर अडचण निर्माण केली आहे. तसेच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळेस डॉ.भामरे यांना मतदान कमी मिळाले होते. यंदा त्याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.
दुसरीकडे काँग्रेसतर्फे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून येथून उमेदवारीसाठी इच्छूक माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असून त्यावर पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी धुळ्यातून राज्यात पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करुन एकप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे.
यंदा पक्षाचे अँकर गटाचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी स्वत: रोहिदास पाटील यांना पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही भूमिकेत आहेत. त्यामुळे अँकर व जवाहर गट एकत्र आल्याचे चित्र आहे. याशिवाय राष्टÑवादीसुद्धा यंदा एकदिलाने काम करीत असल्याचे चित्र धुळे महापालिका निवडणुकीतही दिसून आले. महापालिकेत त्यांना यश मिळाले नाही, ही गोष्ट दुसरी पण ते एकत्र दिसले. याशिवाय भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा डॉ. भामरे यांना विरोध या काँग्रेसच्या पथ्थ्यावरच पडणाऱ्या जमेच्या बाजू आहे.
मात्र बागलाण परिसरात वर्चस्व असलेले पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे हे सुद्धा गेल्या दोन पंचवार्षिकपासून पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. यंदाही त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा जाहीर केली होती. परंतु पक्षाने परत एकदा त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे बागलाण परिसरातील नाराज पक्ष कार्यकर्ते व नेतेमंडळींची मने वळवून त्यांना सोबत घेण्याचे काम पक्षाला आणि रोहिदास पाटील यांना करावे लागणार आहे.