कांदा व कपाशीला भाव मिळावा यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:18 PM2020-05-22T22:18:02+5:302020-05-22T22:25:27+5:30
शेतकरी संघटना : कांद्याला २००० हजार तर कपाशीला ५५५० हमी भाव देण्याची मागणी, आंदोलनादरम्यान राखले फिजिकल डिस्टन्स
पिंपळनेर :कांद्याला २००० तर कपाशीला ५५५० हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. काहीठिकाणी मूठभर कापसाची होळी करण्यात आली.
पिंपळनेर
देशशिरवाडे येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय येथे कापूस व कांदा आंदोलन करण्यात आले. कांद्याला २००० रुपये, तर कपाशीला ५५५० रुपये हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, यांच्या नेतृत्वाखाली सरपंच निलेश पगारे, दादाजी सोनवणे, रामदास कोठावदे, हरिभाऊ कोठावदे, विजय पगारे, रघुनाथ सोनवणे, बळवंत कोठावदे, सुधाकर सोनवणे, गोविंद गवळी, भगवान गवळी, सुरेश शिंदे, मनीष पगारे, रमाकांत सोनवणे आदींनी केले. आंदोलन करतांना फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आले होते. तसेच राज्य शासनाला जाग यावी यासाठी कापूस मूठभर कापूस जाळण्यात आले.
लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा निर्यात खुली करावी, शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळावे यासाठी राज्य सरकारने शेतकºयांच्या कांदा संदर्भात त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हिताचा विचार करावा यासाठी आंदोलन केले. तालुक्यात उभर्टी, शेणपूर, देगाव, प्रतापपूर गावात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
कापडणे
कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता झेंडा चौकात हे आंदोलन झाले. केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने काहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा,अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकºयांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापुस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन करण्यात आले. कापडणे येथे झालेल्या कापूस जाळा आंदोलन प्रसंगी आत्माराम पाटील ,नारायण माळी, रवींद्र वाणी सुमनबाई माळी ,विकास पाटील आदी उपस्थित होते .