भारतीय वायुदलाचा पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:20 PM2019-02-26T13:20:55+5:302019-02-26T13:21:24+5:30
अनेक अड्डे उध्वस्त : १२ मिराज विमानातून बॉम्बचा वर्षाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारतीय वायुदलाच्या टीमने पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करत बॉम्बचा वर्षाव केला़ १२ मिराज विमानातून १ हजार किलो बॉम्ब फेकल्याने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त झाले आहेत़ ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली़ यात सुमारे ३०० दहशतवादी ठार झाले़ संरक्षण राज्यमंत्री ना़ डॉ़ सुभाष भामरे यांचा या घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग राहिला़
पाकिस्तान विरोधात मंगळवारी ‘एअर स्ट्राईक’ मोठी कारवाई केली़ भारतीय वायुसेनेच्या मिराज २ हजार या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद सह दहशतवादी संघटनांच्या तळावर १ हजार किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव केला़ एकाच तडाख्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करीत पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० भारतीय जवानांच्या बलिदानाचा एकप्रकारे बदला घेतला़ या सर्व कारवाईच्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा सक्रीय सहभाग राहिला़ रविवारी रात्रीच डॉ़ सुभाष भामरे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते़ सोमवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठका, चर्चांमध्ये डॉ़भामरे हे व्यस्त होते़
डॉ़ सुभाष भामरे यांनी पुलवामा हल्याचा बदला भारतीय सैन्य दल घेईल, पाकिस्तानला चोख आणि कठोर असे प्रतिउत्तर आम्ही देवू असे बोलून दाखविले होते़ त्यांचे शब्द मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईवरुन खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत़
३०० दहशतवाद्यांचा खात्मा करुन आमच्या शहिद जवानांच्या रक्तांचा बदला घेण्यात आला. भारतीय वायू दलाचा मला अभिमान आहे. पाकिस्तानला मोठी अद्दल आपल्या वीर जवानांनी घडवली आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आले़ यासर्व कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.