प्रचार परवानगीसाठी दिवसभर लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:05 PM2018-11-29T22:05:47+5:302018-11-29T22:06:39+5:30

आठ दिवसांचा कालावधी शिल्लक : आतापर्यंत १२० जणांना परवानगी, पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया

All day long for promotional permission | प्रचार परवानगीसाठी दिवसभर लगबग

प्रचार परवानगीसाठी दिवसभर लगबग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराला केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने मनपात एक खिडकी कार्यालय दिवसभर गजबजले होते़ एक खिडकी योजना कार्यालयाकडून आतापर्यंत १२० उमेदवारांना १२० बॅनर्स व ३४ वाहनांना परवानगी देण्यात आली आहे़ प्रचार साहित्य परवानगी व वाहन तपासणीतून सुमारे दिड लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे़
मनपा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे़ त्यामुळे प्रचार साहित्यास परवानगी घेण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मनपातील एक खिडकी योजनेच्या कार्यालयात गर्दी होत आहे़ लोटगाडी, सायकल, दुचाकी, रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, चारचाकी वाहने, मोठी वाहने, लाऊड स्पीकर यासाठी मनपाची परवानगी घेणे आवश्यक आहे़ मात्र परवानगी घेताना वाहनांच्या नंबरप्लेट झाकल्या जाणार नाही, याची खबरदारी उमेदवारांना घ्यावी लागणार असून आरटीओ विभागाकडून वाहनांची तपासणी करून घेतली जात आहे़ 
उमेदवारांच्या समर्थकांची नाराजी, बंदोबस्तात प्रक्रिया
गुरूवारी दिवसभर एक खिडकी योजनेचे कार्यालय गजबजल्याचे चित्र दिसून आले़ उमेदवारांचे नातेवाईक व समर्थक प्रचार साहित्य परवानगीसाठी रांगा लावत होते़ चिन्ह वाटप प्रक्रियेनंतर प्रचाराला सुरूवात झाली असली तरी काही उमेदवारांना अजूनही परवानगी मिळालेली नाही़ त्यामुळे त्यांना प्रचाराला सुरूवात करता आलेली नाही़ दरम्यान, गुरूवारी एक खिडकी योजनेच्या कार्यालयात गर्दी झाली होती़ आरटीओ विभागाचे काही कर्मचारी उपस्थित नसल्याने परवानगी घेण्यासाठी आलेल्या काहींनी गोंधळ घालत नाराजी व्यक्त केली़ प्रचाराला अल्प कालावधी असताना परवानगी कधी मिळेल, प्रचार कधी करणार? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला़ त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता़ तत्काळ पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला़ त्यानंतर दिवसभर बंदोबस्तात प्रक्रिया सुरू होती़ 
भरारी पथकांची ४ वाहने कमी
महापालिकेने निवडणूकीत ठोस कारवाई करण्यासाठी ६ भरारी पथके नेमली होती़ मात्र या पथकांकडून ठोस कारवाई न झाल्याने पथकांना देण्यात आलेल्या वाहने कमी करण्यात आली आहेत़  
भरारी पथकांकडून केवळ सात ते आठ ठिकाणी किरकोळ कारवाई झाली़ त्यामुळे या पथकांची वाहने काढून ती निवडणूक निरीक्षक, आयकर विभागाच्या पथकांना दिली जाणार आहेत़ 
‘शिट्टी’साठी दाखल याचिका फेटाळली़
आमदार अनिल गोटे यांनी शिट्टी हे निवडणूक चिन्ह मागणी केलेल्या सर्व उमेदवारांना देण्यात यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांची भेट घेतली होती़ मात्र शिट्टी हे मुक्त चिन्ह असल्याने ते सर्व उमेदवारांना देता येणार नाही, असे मिसाळ यांनी स्पष्ट केल्याने प्रभाग १२ सह केवळ १९ उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे़   दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनी त्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्याबाबत बुधवारी कामकाज झाले होते़ त्यानंतर गुरूवारी अंतिम कामकाजाअंती आमदार गोटे यांची मागणी फेटाळण्यात आली़ त्यामुळे आता आमदार अनिल गोटे हे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे़  समान चिन्ह न मिळाल्याने लोकसंग्रामच्या उमेदवारांची अंतिम यादी अजूनही स्पष्ट झालेली नाही़ दरम्यान, ज्या १९ उमेदवारांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले, त्यापैकी १६ उमेदवार हे आमदार अनिल गोटे यांचे समर्थक असल्याचे लोकसंग्रामने स्पष्ट केले आहे़  औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळल्याने आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारांना वेगवेगळया चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे़ त्यामुळे त्यांचा प्रचाराचा फंडा कसा राहतो, याची सर्वांनाच उत्सुकता असेल़ 

Web Title: All day long for promotional permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे