संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची लागली रिघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:06 PM2019-09-03T22:06:35+5:302019-09-03T22:06:58+5:30
पुण्यतिथी सोहळा : दिवसभर भजन-कीर्तनाचा कार्यक्रम, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
धुळे : संतश्रेष्ठ गजानन महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ऋषिपंचमीच्या दिवशी देवपुरमधील रामनगर भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रम झाले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंगळवारी सकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व त्यांच्या पत्नी सुनंदा केले यांच्याहस्ते महाआरती झाली. यावेळी प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्सना पाटील, नगरसेवक नंदू सोनार, रमेश अमृतकर, शैला अमृतसर (मालेगाव) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी मंदिरात मूर्तीला महाभिषेकाला करण्यात आला. सनई चौघड्यांच्या साह्याने मंगलविधी करण्यात येत होते.दुपारी १२.३० ते रात्री १० वाजेपर्यंत स्वामी समर्थ भजनीमंडळ, ब्रह्मचैतन्य भजनीमंडळ, गजानन महिला भजनीमंडळ, मक्ताई भजनी मंडळ, एकता भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, तालुका शिंदखेडा) यांनी भजने सादर केली. साधारण आठ ते दहा हजार भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्षांसह उपाध्यक्ष कमलाकर जोशी, तुळशीराम बोरसे, दिलीप भट, नरेंद्र जोशी, सुभाष निरखे, जितेश जोशी, दीपक दीक्षित व सर्व गजानन भक्तांनी परिश्रम घेतले.