निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:20 AM2019-07-03T11:20:58+5:302019-07-03T11:21:17+5:30
शिरपूर तालुका : लोकसभेप्रमाणेच मतदारांचा कौल राहणार का ? याकडे लक्ष लागून
सुनील साळुंखे।
आॅनलाइन लोकमत
शिरपूर : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. कॉँग्रेसतर्फे विद्यमान आमदारांने नाव आघाडीवर आहे. कोणत्या पक्षातर्फे कोणाला उमेदवारीची संधी मिळते याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान ऐन पावसाळ्यात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण काहीसे तापायला सुरूवात झाली आहे.
या मतदार संघातून १९९० ते २००४ अशा चार पंचवार्षिक निवडणुकीत अमरिशभाई पटेल निवडून आले़ सन २००९ पासून शिरपूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला़ त्यानंतर काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी, भाजप-शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र यावेळी आघाडी-युतीचे संकेत आहेत. मात्र राजकारणात शेवटच्याक्षणी काहीही निर्णय होऊ शकतो.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागले आहेत. शिरपूर विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, बाजार समिती या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचे वर्चस्व आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.
मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाने मताधिक्य मिळविल्याने, यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणुकीसाठी काही जणांची नावे निश्चित मानले जात असले तरी त्यावर पक्षश्रेष्ठींचे शिक्कामोर्तब झालेले नाही.
या निवडणुकीत मतदार परिवर्तन घडवितात की, परंपरा कायम ठेवतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.
इच्छुकांमध्ये उत्तर महाराष्ट्र भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ़जितेंद्र ठाकूर, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, खासदार हिना गावीत यांची लहान बहिण सुप्रिया गावीत यांचा समावेश आहे. तर कॉँग्रेसतर्फे आमदार काशिराम पावरा यांचे नाव निश्चित मानले जात आहे़ इतर पक्षांची नावे मात्र पुढे आली नाहीत.