आहार वाटपात हलगर्जीपणा भोवला
By admin | Published: October 21, 2016 08:12 PM2016-10-21T20:12:07+5:302016-10-21T20:12:07+5:30
गर्भवती आणि स्तनदा मातांना शासनाच्या अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो़ पण, अचानक झालेल्या तपासणीतून हा आहार संबंधित महिलांपर्यंत पोहचलेला नाही़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २१ : गर्भवती आणि स्तनदा मातांना शासनाच्या अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो़ पण, अचानक झालेल्या तपासणीतून हा आहार संबंधित महिलांपर्यंत पोहचलेला नाही़ यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीच्या २० सेविका आणि ५ पर्यवेक्षिका यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिली़
योजनेत १७३ गावे
भारतरत्न डॉ़ए़पी़जे़ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना एक वेळेचा संपूर्ण आहार पुरविण्यात येत आहे़ या योजनेत जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील १०२ आणि शिरपूर तालुक्यातील ७१ अशा १७३ गावांतील महिलांना त्याचा लाभ दिला जात आहे़
अनुसूचित क्षेत्राचा समावेश
ही योजना केवळ साक्री आणि शिरपूर तालुक्यात अर्थात पेसा क्षेत्रात सुरू आहे़ अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (कॅलरिज) आणि प्रथिनांच्या (प्रोटिन्स) कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येणाचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३़१ टक्के एवढे आहे़ आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम येणाऱ्या बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येत असल्याचे संशोधन आणि अभ्यासावरून दिसून आले आहे़ बालक जन्माला आल्यानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे़ अपुरा आहार आणि गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासी समाजामध्ये आवश्यक जागरुकता दिसून येत नाही़
आहारापासून लाभार्थी वंचित
योजनेतील लाभार्थींना एक वेळेचे जेवण देण्याची तरतूद असून विशेष म्हणजे लाभार्थींच्या घरी जाऊन देण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ तडवी यांनी गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी गृह भेटी देण्यास सुरुवात केली. त्यात चर्चेअंती संबंधित महिलांना आहार देण्यात आला नसल्याचे लक्षात आले आहे़ ही शासनाची फसवणूक असल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.