अमरावती मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ वाया जाणाऱ्या पाण्यातून ‘पिक’ नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 07:40 PM2020-10-04T19:40:09+5:302020-10-04T19:40:28+5:30
मालपूर शिवार । हातात आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असुन सध्या नाई व अमरावती नद्यांच्या पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे हे वाया जाणारे पाणी अमरावती नदी पात्रात सोडण्यापेक्षा या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यात ५० क्यसेक्सने सोडण्यात आले आहे. हे कालवे नादुरुस्त असुन अनेक ठिकाणी गळती दिसुन येते आहे. त्यांच्या मधोमध प्रचंड प्रमाणात डोक्यापार कसाड असुन पाणी कालव्याला लागुन असलेल्या शेतशिवारात झिरपून तेथील शेतकºयाचे पिक या पाण्यामुळे धोक्यात आले आहे.
या शेतकऱ्यांनी अनेकदा लेखी तक्रार करुन त्यांची कोणी दखल घेत नसल्यामुळे आता तर हातातोंडाशी आलेला घासावर यामुळे पाणी फिरले आहे़ उभ्या पिकात गुडघाभर पाणी सध्या दिसुन येत आहे.
अमरावती मध्यम प्रकल्पाला ७़५० किलोमीटर लांबीचा डावा व सात किलोमीटर उजवा तसेच सात किलोमीटर वाढीव उजवा कामपूर विखरण मेथी तलाव भरण्यासाठी असा एकुण १४ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. सन १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली होती़ मात्र, या कालव्याचे दर्जेदार काम झालेच नाही. अनेक ठिकाणी या कालव्यांना गळती लागली आहे. तसेच धरणाजवळ पाटचारीच्या मुख्य गेट जवळ मोठ्या प्रमाणात या कालव्यांना पाझर फुटतो़ यामुळे तेथील शेती ही कसण्या योग्य रहात नाही.
नेहमीच ओलावा रहातो. कालव्यांना पाणी सोडल्यावर येथे गुडघाभर पाणी कायम दिसुन येते. यामुळे आता चांगली वाढीस लागलेली व हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर पाण्यात बुडला असल्यामुळे येथील शेतकºयांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करतांना दिसुन येत आहे.