कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास; नरडाणा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: September 14, 2022 06:35 PM2022-09-14T18:35:49+5:302022-09-14T18:37:19+5:30
कंटेनरमधून ४७ लाखांचे व्हॅक्सिन लंपास केल्याची घटना घडली आहे.
धुळे: कंटेनरमधून तब्बल ४७ लाख ३२ हजार रूपयांचे व्हॅक्सिन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना भिवंडी (जि. ठाणे) ते पिंपरखेडा (ता.शिंदखेडा) शिवारातील हॅाटेल अन्नपूर्णा दरम्यान ८ सप्टेंबरच्या दुपारी पावणेचार ते ९ सप्टेंबरच्या रात्री २.५० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी १३ रोजी नरडाणा पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौस्तुभ किशोर कुळकर्णी (४८ रा. सुदर्शन सोसायटी, कल्याण) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानुसार ८ सप्टेंबरच्या दुपारी पावणेचार ते ९ सप्टेंबरच्या रात्री २.५० वाजेदरम्यान भिवंडी जि.ठाणे ते पिंपरखेडा शिवारातील हॅाटेल अन्नपूर्णा दरम्यान कंटेनरमधून (क्र. एमएच ०४-एचडी ४६३९) चोरट्यांनी विविध कंपनीचे ४७ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे एमएसडी व इमरसन कंपनीचे व्हॅक्सिन लंपास केले. कंटेनरच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून हा माल लंपास करण्यात आला.
या गुन्ह्याची नोंद १३ सप्टेंबर रोजी नरडाणा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ अन्वये करून तसा अहवाल न्यायालयात पाठविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामनाथ दिवे करीत आहेत.