गाडीतून लांबविला चोरट्याने लॅपटॉप धुळ्यानजीक महामार्गावरील घटना
By देवेंद्र पाठक | Published: April 9, 2023 07:00 PM2023-04-09T19:00:40+5:302023-04-09T19:00:48+5:30
हॉटेलच्या बाहेर लावलेल्या गाडीतून चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप शिताफीने लांबविला.
धुळे : हॉटेलच्या बाहेर लावलेल्या गाडीतून चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप शिताफीने लांबविला. ही घटना शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. गाडीत लॅपटॉप नसल्याचे समोर येताच शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राम सयाजीराव बोरसे (वय ४९, रा. पुणे) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक हॉटेल गोल्डन लिफ आहे. या हॉटेलच्या बाहेर पार्किंगमध्ये राम बोरसे यांनी आपली एमएच १२ टीएस ५६५९ क्रमांकाची कार लावलेली होती. त्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत ते हॉटेलमध्ये होते. त्यांची गाडी ही बाहेर होती. कोणीतरी चोरट्याने ही संधी साधून त्यांच्या कारचा दरवाजा शिताफीने उघडला आणि गाडीत असलेला ५० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरसे हॉटेलच्या बाहेर पार्किंगकडे गाडी घेण्यासाठी आल्यावर त्यांना कारचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. कारमध्ये तपासणी केली असता त्यांना त्यांचा लॅपटॉप दिसून आला नाही. सर्वत्र चौकशी केली असता त्याचाही काही फारसा उपयोग झाला नाही. शोध घेऊनही उपयोग होत नसल्याने त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले आणि रात्री पावणे आठ वाजता फिर्याद दाखल केली. घटनेचा तपास सुरू आहे.