निवडणुकीत हरल्याचा राग; रॉड, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, १० जणांविरोधात गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: December 20, 2023 12:02 AM2023-12-20T00:02:04+5:302023-12-20T00:02:13+5:30
सहा जणांना दुखापत
देवेंद्र पाठक, धुळे: जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गाव शिवारात सोमवारी दुपारी घडली. यावेळी तलवार, लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याने ६ जणांना दुखापत झाली. याप्रकरणी १० जणांविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील पवनसिंग जयसिंग गिरासे (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्याचा वचपा काढत वाद घालण्यात आला. पूर्वनियोजित कट कारस्थान करत पवनसिंग गिरासे यांना एका गटाने अडविले. तलवार, लाठ्याकाठ्यांसह लोखंडी राॅडने गिरासे यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हाणामारीत पवनसिंग गिरासे, भरतसिंग पहाडसिंग गिरासे, जयपाल भरतसिंग गिरासे, योगेंद्र जयसिंग गिरासे, महेंद सुरतसिंग गिरासे, हरी आनंदसिंग गिरासे (सर्व रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा) यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शिंदखेडा ते आरावे रोडवर विरेंद्रसिंग इंद्रसिंग गिरासे यांच्या संपर्क कार्यालयासमोर सोमवारी दुपारी १:०० ते दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पवनसिंग जयसिंग गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिमठाणे येथील १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गोरावडे करत आहेत.