भाजपाची कोंडी करायला गेले, पण अनिल गोटे-शिवसेनाच तोंडावर आपटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:42 PM2018-12-10T13:42:45+5:302018-12-10T13:43:17+5:30
धुळ्यात अनिल गोटेंनी बंडाचा झेंडा फटकावून स्वतंत्र पक्षाची स्थापन केली. गोटेंच्या लोकसंग्राम या पक्षानं अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहेत.
धुळे- धुळ्यात अनिल गोटेंनी बंडाचा झेंडा फटकावून स्वतंत्र पक्षाची स्थापन केली. गोटेंच्या लोकसंग्राम या पक्षानं अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यांच्या पक्षाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला होता. तरीही गोटेंच्या पदरी निराशाच पडली आहे. गोटेंनीही जिकडे उमेदवार दिले नाहीत, तिथे शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. एकंदरित भाजपाची कोंडी करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश होता. पण जनतेनं अनिल गोटेंचा निभाव लागू दिला नाही. त्यांना जनतेनं सपशेल नाकारून भाजपाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहेत.
भाजपानं आतापर्यंत 39 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनिल गोटेंनी नाटकं केल्यानंच त्यांना यश आलं नाही, अशी टीका धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 2001मध्ये पत्नी हेमा गोटे या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. गोटे यांचे अलीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे डॉ. सुभाष भामरेंवर निशाणा साधत गोटेंनी दानवे आणि गिरीश महाजनांवरही टीका केली होती आणि पक्षाला सोडचिठ्टी दिली होती. तीन वेळा धुळे शहराचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध लढाई असेच प्रत्येक निवडणुकीला स्वरूप दिले.
यंदा त्यांचे लक्ष्य डॉ. भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल होते. सत्ता राबवित असताना सगळ्यांचे संपूर्ण समाधान करता येत नाही. त्यामुळे असंतुष्ट, असमाधानी लोकांची संख्या मोठी असते. गोटे यांचा जोर याच असंतुष्टांवर होता. प्रस्थापित विरुद्ध निष्ठावंत, गुंडगिरी विरुद्ध कोरी पाटी, भ्रष्टाचारी विरुद्ध प्रामाणिक, बहुजन विरुद्ध अल्पसंख्य असे स्वरूप त्यांनी निवडणुकीला दिले होते. परंतु जनतेनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आमदारकीचा राजीनामा दिला नसला तरी लोकसंग्रामच्या माध्यमातून उमेदवार उभे करून बंडाचा झेंडा कायम ठेवला होता. जळगावात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन हे प्रभारी असले तरी आमदार सुरेश भोळे हे निवडणूक प्रमुख होते, हा न्याय धुळ्याला लावण्यात आला नाही. खडसे यांना ‘गुरुबंधू’ संबोधून लढाईला वेगळी दिशा गोटेंनी जाणीवपूर्वक दिली आहे.