अनिल गोटे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:06 PM2019-04-08T17:06:07+5:302019-04-08T17:06:37+5:30
धुळयात सायंकाळी सभा : सभेत करणार खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे शहर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा आज मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला. आमदारकीचा राजीनामा आणि लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीसंदर्भात धुळ्यात सायंकाळी आयोजित प्रचार सभेत खुलासा करणार असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्यांच्या सभेकडे लागले आहे.
धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे हे महापालिका निवडणुकीपासूनच पक्षाविरोधात भूमिका घेत आहे. महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाविरोधात स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे सांगितले. तसेच रविवारी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेतसुद्धा आपण उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट करुन पक्षाविरोधात बंड पुकारले होते. आमदार अनिल गोटे यांची सोमवारी सायंकाळी धुळ्यात प्रचार सभा होणार आहे.
दरम्यानच्या काळात सोमवारी दुपारी आमदार अनिल गोटे यांनी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच धुळ्याकडे रवाना झाले. सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचारसभेत यासंदर्भात ते काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
सभेच्या बॅनरवर प्रधानमंत्री- सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचारसभेसाठी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे. तसेच अनिल गोटे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत असेही म्हटले आहे.
दरम्यान, आपण आमदार पदाचा राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला आहे. तसेच मंगळवारी आपण धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. याबाबत आपण सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचार सभेत आपली भूमिका मांडणार आहोत, असे आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़