अनिल गोटेंनी पकडून दिले पैसे अन् बनावट पिस्तुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:48 PM2019-10-21T16:48:37+5:302019-10-21T17:25:57+5:30
नेहरु नगर परिसर : तणावाचे होते वातावरण
धुळे : शहरातील देवपुर भागात शनी मंदिर परिसरातील एका ठिकाणाहून माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांनी ५० हजाराची रोकड आणि एक बनावट पिस्तूल दुपारी पोलिसांना पकडून दिले़ दरम्यान, मुद्देमाल जप्त करुन देवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक सचिन हिरे यांनी दिली़ तर, पोलीस वेळेवर आले नसते तर माझ्यावर गोळी झाडली असती़ पोलिसांना पाहून ते लोकं पळून गेले असा आरोप अनिल गोटे यांनी केला़ देवपुर भागातील वाडीभोकर रोडवर शनी मंदिर भागात एका ठिकाणी पैसे वाटप केले जात असल्याची माहिती विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अनिल गोटे यांना मिळाली़ माहिती मिळताच स्वत: अनिल गोटे यांनी आपल्या हितचिंतक कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली़ त्यावेळी याच भागात एका ठिकाणी वाटपाच्या उद्देशाने पैसे असल्याचे समोर आले़ यापाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले़ पैसे आणि बनावट पिस्तूल याठिकाणी आढळून आली़ पोलिसांना पाहून काही जणांनी पळ काढला़ पैसे आणि बनावट पिस्तूल ताब्यात घेऊन देवपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ याठिकाणी काही काळ गोटे थांबून होते़ परिणामी वातावरण तणावपुर्ण झाले होते़ पैसे आणि बनावट पिस्तूल पकडण्यात आले असून ते जप्त केले आहेत़ देवपूर पोलिसांकडे हा मुद्देमाल सुपूर्द केला आहे़ याप्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़