पशुसंवर्धन खात्यातील दोघे एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:58 PM2018-12-11T21:58:12+5:302018-12-11T21:58:38+5:30
साडेचार हजाराची लाच : कार्यालयात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पशुसंवर्धन विकास कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि वरिष्ठ लिपीक यांना साडेचार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी पशुसंर्वधन कार्यालयात झाली़ या दोघांना अटक करण्यात आली़
तक्रारदाराकडे भाड्याने दिलेल्या वाहनांचे बिल काढून देण्यासाठीच्या धनादेशापोटी साडेचार हजार रुपयांची मागणी पशुसंर्वधन अधिकारी (वर्ग २) डॉ़ राजेंद्र आत्माराम पाटील (५७) आणि वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण सुकलाल देशमुख (५६) यांनी केली होती़ ही मागणी सोमवार १० डिसेंबर रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती़ तक्रार आल्यानंतर विभागाने पशुसंवर्धन कार्यालयात मंगळवार ११ डिसेंबर रोजी सापळा लावला होता़ यात पैसे स्विकारताना या दोघांना ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ त्यानंतर राजेंद्र पाटील आणि बाळकृण देशमुख या दोघांना ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले़ त्यांची चौकशी केल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, सतीष जावरे, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदिप कदम, सुधीर मोरे यांनी केली़